Thursday, March 29, 2012

बालपण एक सुखद अनुभव


जाहलो मी तरुण
परि मन अजूनही बाल
लहानपणीच्या आठवणी
अजूनही चुंबीताती गाल.....

जीवन स्थिरस्थावर करण्यास
गरुडझेपेची आवश्यकता सतावते
पण मन अजूनही
बालपणीच्या फुलपाखरांमागे धावते.....

हृदयात आता एकच गोष्ट
पैसा पैसा अन पैसा
तरीसुद्धा कधीतरी आठवतात
लहानपणीच्या गोष्टी आणि
त्या गोष्टीतले कासव आणि ससा.....

आज जगती नाही आम्हाला मान
झालो आहोत इथे बेकार
तरी आठवते कसे सारे मित्र होते मानत
आणि मीच होतो सर्वात हुशार.......

जीवनपटावर आता
शुल्लक प्याद्याचे आमुचे स्थान
पण आठवते ते बालपण
जेव्हा आमुच्याच जीवनाचे
आम्ही राजे होतो महान......

आता फिरतो आहोत बदलत
भाड्याची ती घरे
पण आमुच्यासाठी लहानपणी
कधी आम्हीही रचले होते
वाळूचे किल्ले आणि मनोरे.......

आठवतही नाही लहानपणी
किती किती कसे कसे
खेळलो असेन खेळ
आता जमतात फक्त
शब्दांचेच हे खेळ........

जाहलो मी तरुण
परि मन अजूनही बाल
लहानपणीच्या आठवणी
अजूनही चुंबीताती गाल....


genius_pankaj

Monday, March 19, 2012

पुनरावृत्ती


पुन्हा डोळे उघडावे
तेच तेच ते पुन्हा पहावे
पुन्हा पुन्हा तेच ते संदर्भ
केवळ बदलत राहती नावे

पुन्हा भेटावी तीच माया
नित्याची तीच ती नाती
पुन्हा पुन्हा पिचावी काया
पुन्हा त्याच त्या विझणार्या वाती

पुन्हा तोच तोच मोहपाश
मन पुन्हा कुठेतरी जडावे
मग नको नको वाटेतरी पुन्हा
त्याच चिखलात रुतुनी पडावे

पुन्हा तीच पायवाट चालावी
पुन्हा पुन्हा लागावी तीच वळणे
मग तोच तो नित्याचा अंधार
पुन्हा पुन्हा ते ओसाड जगणे

पुन्हा स्वप्नभंग आणि
धाय मोकलून रडावे
अशासाठीच का जन्म सारा
की पुन्हा पुन्हा हे घडावे.........



genius_pankaj