Thursday, October 21, 2010

तू सोडून गेलीस........




तू सोडून गेलीस,
आणि हरवल्या माझ्या चांदराती
पसरला सारा मिट्ट काळोख
उरल्या केवळ अमावस्येच्या राती....


निद्रा गेली केव्हाच उडोन
कूस बदलून मी हैराण
स्वप्न नगरी मज तेव्हापासून
कधीच ना भेटली
सारे चित्र झाले वैराण....


प्राजक्त मनीचा आता न फुलतो,
ना फुलते कधीच रातराणी
जरी घालतो मी रोज त्यांना
डोळ्यांमधील आसवांचे पाणी....


लोपली केव्हाच येथली
आनंदाची मंजुळ गाणी
हृदयपटावर माझ्या आता
वाजते केवळ विराणी....


सारेच आता मनाला
अंधारलेले भयाण क्षण
आधार केवळ एक मनातील
मिणमिणती तुझी आठवण....


genius_pankaj

शब्दबंधित केले आहेत.............




शब्दबंधित केले आहेत
तुझ्या संगतीतले क्षण
करतोय आता त्यांचेच
सांत्वन ओल्या चक्षुनं....

सांग सखे ग असा
काय मी केला होता गुन्हा
मरण यातना तु मला
भोगविल्यास पुन्हा पुन्हा....

सोडुन तू गेलीस मला
कदाचित इतकाच होत ॠणानुबंध
परि सदैव दरवळेल माझ्या मनात
तुझ्या आठवणींचा गंध....



genius_pankaj

अजून सुद्धा कधीतरी कुठेतरी.........



तेच ते रोजचे जीवन जगताना
अजून सुद्धा तू कधीतरी कुठेतरी
वाटेत आकस्मिक दिसतेस
हजारो लाखो जणांच्या गर्दीतही
नजर अगदी सहज खेचून घेतेस

वाटते तेव्हा तसेच येऊन
तुज गाठावे
हळूच येऊन पाठीत थोपटावे

हास्याचे तेव्हा कारंजे फुलावे
दोघांनी मिळून स्वच्छंद हसावे
थोड्या गुजगोष्टी कराव्यात
आणि मनमोकळे मनसोक्त बोलावे

पण पाहून तुझे मंगळसूत्र
आणि हातातील बांगड्या
मन माझे मलाच म्हणते
तिथेच थांब गड्या

दिवस तुझे ते केव्हाच संपले
ते सोनेरी क्षण इतिहास जमा झाले
जे घडले ते तिचे तिला राहिले
आणि तुझे तुलाच राहिले

पुढे सरसावणारे हात
आवरते घेतात
पाय माझे तेव्हा
जागच्या जागीच थबकतात

मनसुबे सारे माझे
तिथेच विरतात
आणि डोळ्यातून दोन अश्रू
खळकन झरतात
आनंदाचे की दुःखाचे??????????




genius_pankaj

मृगजळ...........

कुणी दगड धरू जाता त्यास सोने पडावे हाती।
अथवा आंधळ्यास मिळावी अकस्मात नेत्रज्योती॥

तू भेटलीस ,तेव्हा मज क्षणिक वाटले होते तैसे।
परि तू सुद्धा कमलपत्रावरील निसटणारे दवबिंदु जैसे॥

अखेर तू सुद्धा ठरलीस ना मृगजळ।
क्षितिजावरचा क्षणिक भासमय खेळ॥

genius_pankaj

चल जाऊ दूर कुठेतरी..........



चल जाऊ दूर कुठेतरी
जिथे नसेल आनंदाची उधारी
किंवा नसेल दुःखाचीही दरी….


चल जाऊ दूर कुठेतरी
जिथे नसेल 
ही  दुनिया
प्रेमी जीवाना छळणारी….


चल जाऊ दूर कुठेतरी
जिथे केवळ तू माझ्या
अन मी तुझ्या अंतरी….


सखे
चल जाऊ दूर कुठेतरी
अन शोधू स्वप्नातील
असे एक विश्व ज्याची
रसिक वाचकास ही
करावीशी वाटेल वारी...



genius_pankaj

Monday, October 18, 2010

आहे माझ्या जोडीला........






आहे माझ्या जोडीला
माझाच मला एकांत
नेहमीच आम्ही दोघे
गप्पा मारतो निवांत....


आहे माझ्या जोडीला
माझीच मला सावली
गेले सारे सोडून
तरी हि कधीच न गेली....


आहे माझ्या जोडीला
माझीच मला आसवे
सार्यांनी दूर लोटता
मदतीला यांच्याशिवाय कोण धावे....



genius_pankaj

diary ने विचारले......



किती दिवस झाले
अर्रे आहेस कुठे??
एकदा माझ्या diary ने
मला सहज विचारले
म्हटले मी तिला
आता तुझ्यात लिहिण्यासारखे
माझ्या हाती काय उरले....

नभी ओढ लावणारा
चंद्र केव्हाच लोपला
केवळ निस्तेज आभाळ उरले
आता तुझ्यात लिहिण्यासारखे
माझ्या हाती काय उरले....

पालवी फुटण्याचे आता
दिन कि सरले
केवळ जीर्ण एक खोड उरले
आता तुझ्यात लिहिण्यासारखे
माझ्या हाती काय उरले....

पाहण्यास उरली रिती एक ओंजळ
निर्मळ जळ त्यातील केव्हाच झरले
आता तुझ्यात लिहिण्यासारखे
माझ्या हाती काय उरले....

शब्दांचे आता संग न उरले
हातांचेही काहीसे तसेच जाहले
आता तुझ्यात लिहिण्यासारखे
माझ्या हाती काय उरले....

गोड स्वप्नांची ओढ न आता
आणिक वास्तवाचेही भान न उरले
आता तुझ्यात लिहिण्यासारखे
माझ्या हाती काय उरले....

हिरवे होते कधीतरी
मनाचे पिंपळपान
हिरवळ उडून आता
जाळीचेच अस्तित्व उरले
आता तुझ्यात लिहिण्यासारखे
माझ्या हाती काय उरले....



genius_pankaj

आयुष्य तसे जगावे...........



पानावरील दवबिंदू जसे
आयुष्य तसे जगावे
गळताना सुद्धा
क्षणभर चमकून जावे....

मेघातील जळ जसे
आयुष्य तसे जगावे
एखाद्या चातकाची
क्षुधा शमवूनी जावे
.... 

स्वच्छंद फुलपाखरू जसे
आयुष्य तसे जगावे
दोन दिसांचे जीवन
पण मुक्त बागडावे
.... 

प्रशांत जलधी जसा
आयुष्य तसे जगावे
अंतरात दडले रत्नमोती
तरी गर्वाचे पूर न उचंबळावे
....

तुफानातील दीपस्तंभ जसा
आयुष्य तसे जगावे
सारे आघात झेलूनही
कुणास तरी दिशादर्शक व्हावे
.... 

आयुष्य जगायला हवे जसे
आयुष्य तसे जगावे
संपल्यावर सुद्धा
प्रत्येकाच्या लेखणीतून उतरावे
.... 



genius_pankaj

प्रारंभ..............



करुनी भगवंताचे स्मरण
वंदुनी गुरूंचे चरण
पाहुनी विजयादशमीचा क्षण
आज प्रारंभ हा करीत असे...........

मनास माझ्या पुसून
शब्दखाणी साऱ्या जमवून
रसिकांचे घेऊन आशीर्वचन
आज प्रारंभ हा करीत असे...........