Thursday, November 17, 2011

स्मशानसुख न्यारेच होते




माझे माझे म्हणत होतो ज्यांना
हाय ते शेवटी उपरेच होते

भिकाऱ्यास होती सदा बंद दारे
सुवर्णहात चाटण्या सारेच होते

तिच्याकडून वाटली मिळतील थोडी फुले
पण तिच्याही मुठीत निखारेच होते

उगा अंगावरी कधी उठले कोवळे शहारे
वाहणारे मात्र शुष्क वारेच होते

चोहीकडे दुःखाचे नुसते घुसळलेले सागर
संगतीला केवळ पापण्यांचे किनारेच होते

उगा जीवितासाठी चालू होती धडपड
सरणावर कळले स्मशानसुख न्यारेच होते



genius_pankaj

Friday, October 14, 2011

प्रिये येशील का माघारी.........




तुजवीण वाटे ही दुनिया
सुनी सुनी सारी
प्रिये येशील का माघारी......

चित्र वाटे अधुरे अधुरे
एकटाच मी बसलो किनारी
प्रिये येशील का माघारी....

तुजवीण आनंद सागरास
न येत असे उभारी
प्रिये येशील का माघारी...

शोधते तुलाच सारखी
नजर ही कावरी बावरी
प्रिये येशील का माघारी.....

रोजचेच ते सूर न गवसती
आज वीणेच्या या तारी
प्रिये येशील का माघारी.....

आसवांना कसे सावरू
पापण्यांचे बंद झालेत भारी
प्रिये येशील का माघारी.....

प्राण पाखरू आता
वाटे घेईल भरारी
प्रिये येशील का माघारी.....

--genius_pankaj

Saturday, October 8, 2011

भेट तुझी माझी स्मरते त्या दिसाची...........




भेट तुझी माझी स्मरते त्या दिसाची
शहारलेले माझे तनमन आणि
गती थांबली होती माझ्या श्वासांची ......

आजवर जिला स्वप्नीच केवळ पहिले होते
प्रत्यक्ष भेटताना मात्र आनंदाचे आले भरते
जरा झाली होती घालमेल मनाची
भेट तुझी माझी स्मरते त्या दिसाची.....

काय बोलावे कसे बोलावे मला उमजत नव्हते
पाहण्यासही तुजकडे मन माझे धजत नव्हते
तुझ्याही मुखावर होती लकेर लाजेची
भेट तुझी माझी स्मरते त्या दिसाची......

मग गप्पांत त्या हास्य तुझे फुलले होते
माझेही क्षण तेव्हा मस्त खुलले होते 
वाट जणू धरली होती मस्त स्वर्गाची
भेट तुझी माझी स्मरते त्या दिसाची.....

विनोदांचे नुसते उडवीत होतो फवारे
म्हणालीस "किती हसवशील जरा गप ना रे "
गालावर खळी आणिक उमललेली कळी ओठांची
भेट तुझी माझी स्मरते त्या दिसाची.....

वाटत होते तो प्रत्येक क्षण तिथेच थांबावा
सूर्यास्ताला त्या कुणीतरी बांधून थोपवावा
कुणीतरी दिशाभूल करावी दहाही दिशांची
भेट तुझी माझी स्मरते त्या दिसाची.....

"पुन्हा भेटूच कधीतरी" म्हणालीस निरोप घेताना
आणि पुन्हा पुन्हा मागे वळून पाहताना
पापणी ओलावली होती तुझ्या अन माझ्या डोळ्यांची
भेट तुझी माझी स्मरते त्या दिसाची.....


--genius_pankaj

Sunday, August 28, 2011

तुला स्मरता सहजची


तुला स्मरता सहजची
मनात फुलतो वसंत
आणि उद्विग्न मन
क्षणात होते शांत.....

आठवणींच्या हिंदोळ्यावर 
मन झोके घेते निवांत 
आणि क्षणासाठी का होईना
त्याला पडते जगाची भ्रांत....

त्या मनाचा तेव्हा 
ना लागतो मलाच अंत
पण आनंदाचे सोहळे तेव्हा
तो भोगतो नखशिखांत......

मनी एक प्रतिमा तेव्हा 
उमटते जणू रविकांत 
मन विहार करून येई 
गाठून एक विलक्षण प्रांत.....

पण क्षणात संपतो हा सोहळा
आणि मन पुन्हा मांडते आकांत
असेच काहीसे चालू राहायचे
कदाचित माझ्या अंतापर्यंत.....


genius_pankaj

Monday, May 2, 2011

लाटण्याने मारताना......


कधी कुण्या काळी भाळला होता
वाटली होती ती त्यास स्वर्गातील रंभा
आज पण लाटण्याने मारताना
प्रकट करी ती स्वरूप तिचे जगदंबा..........

अंगी वीररस तिच्या,उडे असा हाहाःकार
आईगं! मेलो गं! फोडे तो बिचारा हुंकार
घर जणू त्यास युद्धभूमीच वाटे
यमसदनीचा यमदूत रोज त्यास भेटे...........

ऑफिसात त्याची पाहून घ्यावी ऐट
पण असे चक्क ती बेगडी
कुठेच कुणास ना ठाऊक हा पठ्ठा
घरी असे चक्क घरगडी....

रोज त्याच्या मागे ती
बनून फिरे हिटलर
लाटण्याने मारताना म्हणे
आता हे काम कर मग ते काम कर.....

वटसावित्रीला, "सात जन्म हाच पती लाभो"
म्हणे वडाला करून ती स्पर्श
खिडकीतून पाहताना तो म्हणे
देवा हे चालू आहे पहिले वर्ष की सातवे वर्ष......

कधी त्याच्या मुखी
न शब्द फुटे चकार
निघालाच कधी चुकून तर
कानाखाली तिचे बसती सपासप वार.....

खरच त्याची मला फारच येई कीव
वाटे त्याची काय अवस्था ही बिचारी
आणि मग माझ्या थोडे हसू येई गाली
आणि वाटे बरे आम्ही आहोत ब्रम्हचारी......

genius_pankaj

Thursday, April 7, 2011

प्रत्येकाच्या मनात.........




प्रत्येकाच्या मनात असते एक कविता
भाग्यवान ज्यांना व्यक्त होण्यास मिळते शब्द सरिता.....

प्रत्येकाच्या मनात असतात भावनांचे सागर
भाग्यवान ज्यांना मिळते शब्दांची किनार ..........

प्रत्येकाच्या मनात असतात कल्पनेचे मोती
भाग्यवान ज्यांना ते शब्दांत गोवता येती............... 

प्रत्येकाच्या मनात असतात आठवणींच्या लाख कळ्या
भाग्यवान ज्यांच्या कळ्या शब्दरुपाने फुलल्या.........

प्रत्येकाच्या मनात असतात असंख्य कृष्णविवरे
भाग्यवान ज्यांना मिळतात शब्दरूपी प्रकाशांची दारे.......

प्रत्येकाच्या मनात असतं निरागस चांदण
भाग्यवान ज्यांना चांदण्यासाठी मिळते शब्दांचे कोंदण...........

प्रत्येकाच्या मनात असतो सदैव एक मी
भाग्यवान ज्यांना लीन करता येतो मी शब्दब्रम्ही.........


genius_pankaj


Friday, January 21, 2011

व्यथा.......

चाललो होतो असाच एकदा
पाठून दिला कुणीतरी आवाज
दादा एक रुपया तरी दे आज

मागे वळून पाहता
पसरले होते हात चिमुकले
कोमेजलेला चेहरा आणिक
डोळ्यातील पाणी सुकलेले

चेहऱ्यावरील भाव बोलती
काहीतरी दे
याचना करतो तुजपाशी
माझ्या सकट आज माझी
भावंडे आहेत उपाशी

बापास दारूचा संग
त्यास आठवते ना घरदार
आई अंथरुणाला खिळलेली
पडली आहे कायमची बिमार

असा मोडलेला घराचा कणा
घरी नसे एकही दाणा
सगेसोयरे करतात हडहड
असह्य होते भुकेसाठी धडपड

सांगायलाही नाही वेळ
ही करुण कहाणी
डोळे ही थकले आता
गाळून सारखे पाणी

पाहून नयनांत त्या
पीळवटले माझे आतडे
सहज हात गेला खिशाकडे
काढून दिले थोडे रोकडे

मग क्षणात फुल ते
लागले सुंदर हसू
पाहून निरागस हास्य ते
नयनांत माझ्या चमकले
अलगद दोन आसू


genius_pankaj

Sunday, January 2, 2011

लिहायचे ते लिहून टाकू.......


आयुष्यभर आसवे गाळून थकलो
भाव मनाचे आता
थोडे कागदावर फेकू
लिहायचे ते लिहून टाकू.......

मनात साठला आहे चिखल
जशी वटवृक्षाखाली त्याची पानगळ
म्हटले जरा झाडलोट करून टाकू
लिहायचे ते लिहून टाकू.......

आयुष्यभर इतरांचेच ऐकत आलो
म्हटले जरा आता हळव्या मनाचे ऐकू
लिहायचे ते लिहून टाकू.......

अर्थ न कळले कधी गहिरे
कल्पनेचे ना कधी फुटले धुमारे
म्हटले थोडे शब्दज्ञान तरी पारखू
लिहायचे ते लिहून टाकू.......

मन म्हणाले मला
पहा काव्य नभांगणी भरली
कित्येक तेजःपुंज कवींची सभा
चल आपणही तिथे
थोडे मिणमिणते झळकू
लिहायचे ते लिहून टाकू.......


genius_pankaj

शिवराया नामक होती ती प्रचंड लाट...................



खड्गाच्या जयाने मातृभूमी उद्धरिली
स्वातंत्र्याची आस ज्याने नित्य हृदयी धरिली
दाविली जयाने या मुलुखास स्वराज्याची पहाट
शिवराया नामक होती ती प्रचंड लाट.....

सारी यवनी सत्ता ज्या लाटेत वाहून गेली
मराठ्यांची स्वराज्य द्वारका उभी राहिली
दाविले सामर्थ्य ज्याने न करिता बोभाट
शिवराया नामक होती ती प्रचंड लाट....

शिवराया नामक कोसळली तेजाची धार
जिने तीनशे वर्षांचा कापून काढला अंधार
यवनांचा बिमोड करायचा घातला घाट
शिवराया नामक होती ती प्रचंड लाट.....

ज्याने मराठ्यांची जागवली अस्मिता
सारी जनता केली सस्मिता
जन म्हणती भेटला असा राजा पुण्य आमुचे अफाट
शिवराया नामक होती ती प्रचंड लाट.....

ज्याने अगाध कर्तुत्व गाजवले
चारी पातशहा लाजवले
जाहला जो हिंदवी स्वराज्याचा अभिषिक्त सम्राट
शिवराया नामक होती ती प्रचंड लाट.....

चारशे वर्षानंतरही ज्याच्या सामर्थ्याचे पोवाडे गायले जातात
ज्याचा पराक्रम पाहून आजही बाहू स्फुरतात
ज्यासी आठवता सहजची हात जोडले जातात
ऐसा राजा ज्याच्या शक्ती युक्तीने केले सर्वाना चाट
शिवराया नामक होती ती प्रचंड लाट......


genius_pankaj